'तान्ह्या बाळासाठीच्या दुधाचाही व्यापार केला जातो' हे आपणास ठाऊक आहे काय?

नैतिक आणि अनैतिक अशा दोन्ही बाबींबाबत आपल्या मनात नेहमीच एक द्वंद्व असतं!

प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार, गरजेनुसार या व्याख्या बदलत असतात. लहान मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणारे आईवडील आपल्या दृष्टीने अनैतिक कृत्य करत असतात पण विकलांग परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी त्याला तसे करण्यास प्रवृत्त करणे ही त्यांची गरज असू शकते!

आपल्या नवजात बाळाला अंगावरील दूध पाजण्यास असमर्थ असलेल्या स्त्रीला जर दुसऱ्या सशक्त स्त्रीने आपले दूध पाजले तर ते पुण्यकार्य, आणि अर्थातच नैतिक! पण चार पैसे कमावण्यासाठी जर ती स्त्री त्या दुधाचा व्यापार करत असेल तर त्याला तुम्ही काय नाव द्याल?

असंच कुठेतरी याबद्दल ऐकलं आणि मग त्याची शहानिशा करण्यासाठी गुगलबाबाला साद घातली तेव्हा जे सत्य समोर आलं, ते मात्र विदारक होतं!

बऱ्याच कंबोडियन महिला आपले दूध अमेरिकन महिलांना विकत होत्या. ज्या स्त्रिया स्वत:च्या मुलांना स्वतःचे दूध देऊ शकत नाहीत अशा अमेरिकन महिलांना हे दूध चढ्या दराने विकले जात होते. कंबोडियात याबद्दल बरेच वादंग झाले आणि सरकारने नेमलेल्या चौकशी अहवालांमध्ये हे स्पष्ट झाले की असा अनैतिक व्यापार देशात सर्रास होत आहे. आता कंबोडिया सरकारने या अनैतिक प्रथेवर बंदी घातली आहे.

कंबोडियातील दूध व्यापार…

कंबोडियातील अ‍ॅम्ब्रोसिया या ठिकाणी दूध संकलन करण्यासाठी आणि अमेरिकेत विकण्यासाठी कंबोडियातील गरीब भागातील महिलांशी संपर्क साधला जात असे. त्याचे व्यावसायिक स्वरूप किती भयंकर बनले आहे हे आपल्याला किंमतीवरून समजेल. अ‍ॅम्ब्रोसियामधील गरीब कंबोडियन स्त्रियांना 28 मिली साठी अर्धा डॉलर दिला जात असे. पण तेच दूध अमेरिकेत जवळजवळ 18 डॉलर्सना विकले जात असे!

दूध केंद्रावरील दूध देण्यासाठीची रांग..

व्यवसाय खरोखरच थांबला आहे का?

युनिसेफच्या सूचनेनंतर हा अनैतिक व्यापार संपुष्टात आला असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तविक चित्र तसे नाही. सध्याच्या काळातही बर्‍याच कंपन्या ऑनलाईन विक्री करतात. अमेरिकेव्यतिरिक्त, बर्‍याच कंपन्या भारतातही ऑनलाईन विक्री करीत आहेत.

विक्रीस असलेले बाटलीबंद दूध…

आणि ही, फेसबुकवर एका मातेने स्वतःचं दूध विकण्यासाठी केलेली जाहिरात…

सायप्रसच्या राफेला लॅम्परू या दोन बाळांच्या आईने स्वतःचे दूध विकून आजवर जवळजवळ साडेचार लाख रुपये कमावले आहेत.

"त्या काळात मला खूपच दूध यायचं, छाती अगदी भरून जायची. मग मी गरजू स्त्रियांना दुग्धदान करण्यास सुरुवात केली. पण मग हळूहळू पुरुषांकडूनही मागणी येऊ लागली. अँथलिट्स व बॉडिबिल्डर्स करून विशेष मागणी येऊ लागली. तेव्हा मी या दुधाचा व्यापार करायचं ठरवलं." तिने सांगितलं.

सुदैवाने आजही भारतात 'आईच्या दुधाचा व्यापार' हे शब्दही शिवीसारखे वापरले जातात. भारतीय संस्कृतीत मातांना सर्वात जास्त मान दिला जातो.

मात्र, एक समाजकार्य म्हणून श्री देवेंद्र अग्रवाल यांनी उदयपूर, राजस्थान येथे "दिव्य मदर मिल्क बँक" या नावाने एक संस्था सुरू केली असून, तेथे महिलांच्या दुधाचे संकलन केले जाते. अर्थात, फक्त अशाच मातांकडून हे दूध प्राप्त केले जाते ज्या आपल्या बाळाची गरज भागवून इतरांसाठी जास्तीचे दूध दान करू शकतात. आईच्या दुधाअभावी कुपोषणामुळे पीडित मुलांसाठी हे एक वरदानच ठरले आहे.

अशा प्रकारच्या दूध बँका उघडण्याची गरज अनेक कारणांमुळे आहे. बालमृत्यू दर कमी करणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. युनिसेफच्या एका अहवालानुसार जन्मानंतरच्या पाच वर्षांत आतड्यांसंबंधी विकाराने पीडित मुलांपैकी 70 टक्के मुले ही जन्मापासूनच्या एका महिन्यात मृत्युमुखी पडतात.

यापैकी 16 ते 22 टक्के मुले अशी आहेत की जर त्यांना स्तनपान मिळाले असते तर ती वाचू शकली असती. आईचे दूध पिणार्‍या मुलांची जगण्याची क्षमता 6 ते 8 पटीने वाढते. त्यांचे आरोग्य 40 टक्के वेगाने सुधारते.

दुग्धदान कोण करू शकतं?

'जास्तीचे दूध' हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, परंतु काही स्त्रियांमध्ये हार्मोन्समुळे जास्त प्रमाणात दूध तयार होते. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्येही असेच एक प्रकरण पाहायला मिळाले आहे. तबीठा फ्रॉस्ट नावाच्या अमेरिकन महिलेला दिवसाला 3 लीटर दुध येत असे. तिने आतापर्यंत सुमारे 470 लीटर स्तन दुध दान केले आहे.

खरोखर हा विचित्र व्यवसाय नाही काय?




Comments

Popular posts from this blog

Why banks don't give loans by pledging agricultural land?

कहा राजा भोज और कहा गंगु तेली' या म्हणीचा अर्थ काय?

Is it possible to get loan on agricultural land in India?